रास्त दर धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवणार : आ. किरण सामंत

राजापूर : सातत्याने होणारा सर्व्हेर, पुरेशा नेटवर्कअभावी ऑनलाईन पावती न होणे, कमिशन वाढ यांसह अन्य रास्त दर धान्य दुकानदार आणि शिधापत्रिकाधारकांच्या विविध समस्यांकडे रास्त दर धान्य दुकानदार संघटना, राजापूरचे अध्यक्ष अॅड. महेश नकाशे यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आ. किरण सामंत यांचे लक्ष वेधले. यावेळी चर्चा करताना आ. सामंत यांनी रास्त दर धान्य दुकानदार आणि शिधापत्रिका धारकांच्या विविध समस्या समजून घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील रास्त दर धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि रास्त दर धान्य दुकानदार यांची नुकतीच शहरातील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीच्यावेळी रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई, राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर, अॅड. शशिकांत सुतार, योगेश नकाशे, ओंकार प्रभूदेसाई, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अॅड. नकाशे, सचिव दीपक जाधव यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी आणि रास्त दर धान्य दुकानदार उपस्थित होते.

यावेळी आमदार सामंत यांच्याशी चर्चा करताना रास्त दर धान्य दुकानदार संघटननेने निवेदनाद्वारे दुकानदारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार गंबरे यांनी मार्गदर्शन केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर, अॅड. शशिकांत सुतार, योगेश नकाशे, ओंकार प्रभूदेसाई यांनी चर्चेमध्ये सहभागी होत रास्त दर धान्य दुकानदार आणि शिधापत्रिका धारकांच्या समस्या मांडल्या.

शिधापत्रिका तत्काळ बदलून मिळाव्यात
सन २०१२ पासून आजपर्यंत शिधापत्रिका बदलून देण्यात आलेल्या नसून सध्या वापरात असणाऱ्या शिधापत्रिका खराब आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर धान्याची नोंद करण्यास अडथळा येत असल्याने त्या तत्काळ बदलून मिळाव्यात आदी विविध मागण्या करण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 08/Feb/2025