खेड : शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा व चर्चेचा विषय असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र दुरुस्ती कामाची गती वाढली असून, सांस्कृतिक केंद्र पुन्हा सुरू होण्यासाठी आवश्यक कामांसाठी शिंदे सरकारने ९कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यापैकी १ कोटी ८५ लाख रुपयांच्या संरचनात्मक दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्याचे काम ना. योगेश कदम यांच्या निरीक्षणाखाली गतिमान झाले आहे.
खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र उद्घाटन झाल्यानंतर अल्पावधीतच नादुरुस्त झाले होते. या इमारतीची दुरुस्ती करून पुन्हा ही वास्तू वापरात यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु पलिकेमार्फत दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील गेल्या पंधरा वर्षांत सांस्कृतिक केंद्र खुले झाले नाही. परिणामी खेडच्या सांस्कृतिक चळवळीला उतरती कळा लागली होती.
खेडमधील सांस्कृतिक केंद्र सुरू कधी होणार हा यक्ष प्रश्न्न बनून राहिला होता. मात्र आ. योगेश कदम यांनी पहिल्या आमदारकीच्या टप्प्यात या कामाचे भूमिपूजन केले. या सांस्कृतिक केंद्राला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी ९ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी घेण्यात त्यांना यश आले. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यात सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीमध्ये संरचनात्मक दुरुस्ती चे काम केले जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये मंजूर असून, हे काम मुंबई येथील तज्ज्ञ ठेकेदारामार्फत केले जात आहे. त्यासाठी त्यांना दि.१२ मार्च २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासह दहा महिन्याची मुदत आहे. सांस्कृतिक केंद्राचा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात परिसर सुशोभीकरण, अंतर्गत नूतनीकरण आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अभियंता प्रणव सस्ते यांनी दिली. आगामी एक ते दोन वर्षा नंतर सांस्कृतिक केंद्र पुन्हा खेड वासियांच्या सेवेत रुजू होण्याचे आशादायक चित्र त्यामुळे निर्माण झाले आहे.
आ. योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश…
आ. योगेश कदम यांनी पाच वर्षांपासून पासून स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सांस्कृतिक केंद्रासाठी निधीची तातडीने तरतूद केली. त्यामुळे आता या कामाला गती मिळाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 08/Feb/2025














