राजापूर : रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. साखरीनाटे येथे सुमारे १५३ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे सर्व सोयीसुविधांनी युक्त बंदर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा, दापोलीतील हर्णे व राजापुरातील साखरीनाटे ही तीन प्रमुख बंदरे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखली जातात. जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्यावर साखरीनाटे हे एक मोठे मासेमारी बंदर असून, जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सुमारे ४५० मासेमारी नौका कार्यरत असून, मासळी उतरवून घेण्यासाठी मच्छीमार बांधव या बंदरातील सुविधांचा वापर करतात. मात्र, साखरीनाटे क्षेत्रातील मासेमारीचा मोठ्या प्रमाणाचा विचार करता मासेमारी करणाऱ्या बोटीच्या व मच्छीमार बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरेशा नव्हत्या. त्यामुळे साखरीनाटे येथे विविध सोयीसुविधांनी सुसज्ज असे मच्छीमार बंदर व्हावे, अशी स्थानिक मच्छीमारांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.
त्यानुसार शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने साखरीनाटे येथे मत्स्य बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, प्रतिवर्ष ३५०५०.०० टन मासे हाताळण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या उभारणीसाठी सुमारे १५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या बंदराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, सध्या बंदराचे काम जोमाने सुरू आहे.
सर्वसुविधांनी युक्त बंदर
बंदरामध्ये मासळी लिलावगृह, जाळी विणण्यासाठी शेड, गिअर शेड, बोट दुरूस्ती शेड, प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, उपहारगृह, स्वच्छतागृह, रेडियो कम्युनिकेशन सेंटर, सांडपाणी निचरा व प्रक्रिया व्यवस्था, नौकानयन व रेडियो कम्युनिकेशन साहित्य, अग्निशमन व्यवस्था, अशा सुविधा असणार आहेत. या बंदरामुळे येथील मच्छीमारांना सुसज्ज असे मत्स्यबंदर उपलब्ध होणार असून मच्छीमार बांधवांना बोटीसाठी सुलभ नौकानयन मार्ग प्राप्त होणार आहे. शिवाय मच्छीव्यवसायतही वाढ होणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 11/Feb/2025














