रत्नागिरी : जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षांसाठी 111 भरारी पथके

रत्नागिरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 16 हजार 54 विद्यार्थी बारावी, तर 18 हजार 388 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. या परीक्षेसाठी 73 जिल्हास्तरीय भरारी पथकांची तसेच 38 बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे.

या परीक्षांसाठी 13 परिरक्षक कार्यालये आहेत. उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 163 कनिष्ठ महाविद्यालये असून, 38 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 54 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. जिल्ह्यात एकूण 434 माध्यमिक शाळा असून, 73 परीक्षा केंद्रांवर 38 हजार 388 दहावीचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. जिल्ह्यात मागील पाच वर्षांमध्ये एकही संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आलेले नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 12-02-2025

Rotary School