गुहागर : सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थानच्या वतीने तळवलीत रस्त्याची डागडुजी

गुहागर : तळवली हॉस्पिटल स्टॉप या रस्त्याच्या कामाला अजूनही मुहूर्त सापडत नाही. रस्ते, पाणी, पाखाड्या ही कामे जर ग्रामस्थांनी श्रमदानातून करायची असतील तर मग प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय करणार, असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे. वारंवार या रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ सध्या येथील ग्रामस्थ, सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संघटनांवर आली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री सुकाई देवी ग्रामदेवता देवस्थानच्यावतीने नुकतीच तळवली हॉस्पिटल स्टॉप रस्त्याची डागडुजी करण्यात आली. देवस्थानने राबविलेल्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी सामाजिक दायित्व असलेले विनोद मयेकर व विवेक मयेकर तसेच निगुंडळ पोलिसपाटील प्रकाश आंबवकर यांनी सहकार्य केले.

यावेळी तळवली ग्रामदेवता कमिटी सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार अनंत डावल, चंद्रकांत बोटके, दिलीप आग्रे, तेजस कळंबाटे, उत्तम पवार, अमित पोफळे, उमेश पवार आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 12/Feb/2025