गुहागरातील सात व्यावसायिकांना ३ कोटी ६२ लाखांचा दंडाची नोटीस

गुहागर : शासकीय जागांवर भाडेपट्टीवर असलेल्या गुहागर शहरातील नाक्यावरील श्री व्याडेश्वर मंदिरालगतच्या सात व्यावसायिकांना महसूल विभागाने आता अंतिम नोटीस बजावली आहे. रेडीरेकनर दराप्रमाणे सुधारीत दंडाची रक्कम तब्बल ३ कोटी ६२ लाख ३६ हजार ७५३ रुपयांवर पोहोचली असून, रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. गुहागरात महसूल विभागाची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

शहर नाक्यातील श्री व्याडेश्वर मंदिरालगत ७ जणांना महसूलच्या जागेवर भाडेपट्टधावर जागा देण्यात आली होती. १९६७ पर्यंत या जागांचा भाडेपट्टा भरण्यात आला होता. त्यानंतर यातील काहींनी आपण कब्जेदार असल्याचाही दावा गुहागर महसूलसह जिल्हाधिकारी कार्यालयात केला होता. परंतु, या सर्वांची तपासणी सुरू असताना ही जागा महसूल विभागाची असल्याचे नक्की झाल्यावर या सातजणांना ते भाडेपट्ट्यावर असल्याने इतर अधिकारात ठेवण्यात आले होते.

त्यानंतर या सातही जणांना या जागेचे १९६७ पासूनचे भाडे व्याजासहीत भरण्याचे आदेश काढण्यात आले होते. या आदेशाविरोधात येथील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील केले होते. यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी महसूलच्या बाजूने निकाल देत भाडेपट्टा बसुलीचा आदेश कायम ठेवला होता.

दरम्यान, २०२२ मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी भाडेपट्टा दंड वसुलीचा दिलेल्या निर्णयावर या व्यावसायिकांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अपील केले होते. मात्र, या अपिलाचा निकालही महसूल विभागाच्या बाजूने लागल्याने सप्टेंबर महिन्यामध्ये त्या सातहीजणांना १९६७ सालापासून त्यांना नेमून दिलेल्या जागेचा तब्बल २ कोटी २२ लाख ३१ हजार ४५० रूपये भाडेपट्टा दंड भरण्याची नोटीस बजावली होती. या निर्णयाविरोधात या व्यावसायीकांना ९० दिवसांच्या आत महसूलमंत्री यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध होती.

मात्र, त्यांनी कुठेही अपील केलेले नाही. यामुळे गुहागर महसूल विभागाने ३ फेब्रुवारी रोजी भाडेपट्टा दंड रक्कम वसुलीसाठी अंतिम नोटीस बजावली आहे. सदर रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला आहे.

अंतिम दिलेल्या नोटीसीमध्ये लिलावती पुरुषोत्तम मोतदार यांना १४ लाख ८९ हजार ९९८ रुपये, सुधाकर रघुनाथ कामेरकर यांना १ कोटी २५ लाख १५ हजार ९८४ रुपये, उर्मिला अरविंद वेल्हाळ १२ यांना ११ लाख ९१ हजार ९९८ रुपये, निर्मला बारटक्के यांना ४७ लाख ६७ हजार ९९४ रुपये, अंजली सूर्यकांत बकरे व ३ यांना १ कोटी २० लाख ३९ हजार १८४ रुपये, मनोज अरविंद बारटक्के यांना ५१ लाख ९१ हजार ५९८ रुपये, रवींद्र भरत बावधनकर यांना ३० लाख ३९ हजार ५९६ रुपये भाडेपट्टा दंडाची वसुली बजावणी करण्यात आली आहे.

रेडीरेकनर दरामुळे वाढली दंडाची रक्कम
गुहागर महसूल विभागाने याअगोदर बजावलेली भाडेपट्टा दंडाची रक्कम ही १९६७ ते २००७ पर्यंत होती. ही रक्कम २ कोटी २२ लाख ३५ हजार ४९० रूपये होती. मात्र अंतिम नोटीस काढताना या सालातील रेडरिकनर दराची माहिती मागविली होती. ही माहिती १९७८ पासूनच मिळाली असल्याने दंड नोटीस कार्यवाही ज्या सालापासून सुरू झाली त्यापासून सन २०२२ पर्यंतची दंड रक्कम आकारण्यात आली आहे. यामुळे हीच रक्कम आता ३ कोटी ६२ लाख ३६ हजार ७५३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 14/Feb/2025