मेडिकल कॉलेजमध्ये रत्नागिरीचा कोटा वाढवून घेणार : आ. भास्कर जाधव

गुहागर : रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे विद्यार्थी असून त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मेडिकल कॉलेजचा कोल्हापूरच्या धर्तीवर रत्नागिरीचा कोटा वाढवून घेणार असल्याचे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग १५ वा वित्त आयोगांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गुहागरच्या सुसज्ज नूतन इमारतीचे उद्घाटन आ. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तसेच प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते तर तालुका आरोग्य अधिकारी दालनाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी तर आरोग्य माहिती व्यवस्थापन कक्षाचे उ‌द्घाटन गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, जि. प. चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, उबाठा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, गुहागर शहर प्रमुख विनायक जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, युवा शहर अध्यक्ष राज विखारे, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यार्थप्रकाश बळवंत तसेच सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले, गुहागर नगरपंचायत होण्यासाठी सर्व पक्षातील लोकांना एकत्रित करून प्रयत्न केले, नगरपंचायतच्या निवडणुकीपूर्वी १९ कोटी रुपये नगरपंचायतमध्ये जमा केले.

नगरपंचायतच्या माध्यमातून चांगले रस्ते, स्ट्रीट लाईट, प्रत्येक घरासमोर तसेच नागरिकांना जाण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले. जेवढ्या करण्यासारख्या गोष्टी होत्या तेवढ्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी पाच कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली. डायलेसिस सेंटर तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला.

अशा अनेक सुविधा आरोग्य क्षेत्रामध्ये आपण केल्या असून यापुढेही नागरिकांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास मी केला आहे यामुळे निवडणुका आल्यावर अनेकजण उमेदवारीसाठी या मतदारसंघात प्रयत्नशील असतात. महिला बचत गटासाठी रेल्वे स्टेशनवर स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न केले त्याला यशही आले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, आपण जि. प. अध्यक्ष असताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या विविध सोयी-सुविधा व उपचारांची माहिती दिली. गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोनच एमबीबीएस झालेले डॉक्टर असून या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 17/Feb/2025