रॅगिंगच्या उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : डॉ. विकास पाटील

राजापूर : रॅगिंग ही खूप मोठी समस्या असून, विद्यार्थ्यांनी त्यापासून दूर राहिले पाहिजे. ‘मी रॅगिंग करणार नाही, मी रॅगिंग सहन करणार नाही, मी रॅगिंग करू देणार नाहीं’ अशी त्रिसूत्री प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर रॅगिंगचा हा रोग समूळ नष्ट होईल. विद्यार्थी, पालक, शासन यांनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. रॅगिंगच्या समूळ उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून आपण सर्वांनीच सामूहिक प्रयत्न करूया, असे आवाहन डॉ. विकास पाटील यांनी केले. ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात अँटी रॅगिंग विभाग आयोजित ‘रॅगिंगचे दुष्परिणाम’ या विषयावर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ए. डी. पाटील, प्रा. एस.एस. धोंगडे, प्रा.एन. जी. देवन, प्रा.एस.जी. चव्हाण, प्रा. पी.पी. राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून प्रा. पी.पी. राठोड यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम जाणून घेऊन या रोगापासून प्रत्येक विद्यार्थ्यान स्वतः ला दूर ठेवल्यास रॅगिंगची समस्या उद्भवणार नाही. म्हणूनच आपण सर्वांनी रॅगिंगच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. ए. डी. पाटील यांनी केले.

यावेळी अँटी रॅगिंग संदर्भात प्रबोधनपर शॉर्ट फिल्म दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. पी.पी. राठोड यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 18/Feb/2025

Shanti 3