देवरुखातील जि. प. प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

देवरूख : शहरातील सर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विनंती मागणीवरुन शहरातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये नगर पंचायतीने आयडीबीआय बँक शाखा देवरूखच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्याचबरोबर समाजात वाढणारे गैरप्रकार यांचे गांभीर्य लक्षात घेवून शहरातील जि. प. सर्व शाळा यांच्या मुख्याध्यापकांची काही दिवसांपूर्वी नगर पंचायत कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन विसपुते, आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रतिक मनवानी यांचेसमवेत बैठक घेतली.

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आवश्यक असल्याचे तसेच याकरीता शाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान प्राप्त होणार नसल्याने नगर पंचायतीकडून सहकार्य व्हावे, अशी यावेळी मुख्याध्यापक यांनी मागणी केली. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे गांर्भीय लक्षात घेवून तातडीने आयडीबीआय बँकेने त्यांचेकडील सीएसआर निधीमधून जिल्हा परिषद मालकीचे शाळांना सीसीटीव्ही बसविणेबाबत सहमती दर्शविली.

आयडीबीआय बँक शाखा देवरुख यांचेकडून 20 फेब्रुवारी रोजी देवरुख शहरातील 9 शाळांना प्रत्येकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर तसेच हार्ड ड्राईव्ह सहीत संपूर्ण सीसीटीव्ही संच बसविण्यात आला आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे शालेय आवारातील हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच सुरक्षितता राखणे शिक्षकांसाठी त्याचबरोबर पालक वर्गासाठीही दिलासादायक झाले आहे.

याबद्दल देवरुख नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन विसपुते व आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रतिक मनवानी यांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व स्थानिक नागरिक यांनी आभार मानले. शहर परिसरातून या कार्याबद्दल नगर पंचायत व आयडीबीआय बँकेचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 24-02-2025