रत्नागिरी : सहा वर्षांपर्वी शहरातील गाडीतळ येथे एसटीबस चालकाला मारहाण केल्याप्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने सोमवारी २ वर्षे कारावास व २ हजार ७०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
सचिन भिकाजी रायकर (४४, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), महेंद्र महादेव फणसे व सिद्धेश अनंत धुळप अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना १० फेब्रुवारी २०१९ रात्री नऊच्या सुमारास घडली होती. सरकारी कामात अडथळा व शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
खटल्यातील माहितीनुसार रत्नागिरी आगारातील शहर एसटी बस चालक सतीश नरहरी पाडाळकर (४६, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी) हे १० फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळी काळबादेवी ते रत्नागिरी बसस्टैंड अशी बस चालवित घेऊन येत होत. पाडाळकर हे एसटी बस घेऊन गाडीतळ येथे आले असता दुचाकीवरील तिघांनी अंगावर गाडी घालतोस काय असे म्हणत बस थांबवली.
यावेळी बसचालक व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. आरोपी यांनी हाताच्या थापटाने मारहाण केली. अशी तक्रार पाडाळकर यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयापुढे दोषारोप पत्र दाखल केले होते. सोमवारी या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. जिल्हा सरकारी अभियोक्ता फणसेकर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तिनही आरोपींना २ वर्षे कारावास व २ हजार ७०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे व हवालदार साळवी, मोहिते यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 25/Feb/2025














