पतितपावन मंदिरात सहभजनासह सहभोजनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने सोमवार २४ फेब्रुवारी रोजी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर येथील ऐतहासिक पतितपावन मंदिरात सहभोजनाचा आस्वाद हजारो रत्नागिरीकरांनी घेतला. सहभजनाच्या नामघोषाने सारा परिसर भक्तिमय झाला.

भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित शोभायात्रेला सोमवारी सकाळी खालची आळी येथील श्रीदेव भैरी मंदिर येथून प्रारंभ झाला. ही शोभायात्रा प्रमोद महाजन क्रीडा संकुल जवळून आठवडा बाजार येथून एसटी बसस्थानक, जयस्तंभ ते मारुती मंदिर अशी मार्गक्रमण करत नंतर मारुती मंदिर येथून जयस्तंभ रामआळी मार्गे पतितपावन मंदिरापर्यंत येऊन समाप्त झाली.

त्यानंतर पतितपावन मंदिरात बांधकाम व्यावसायिक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट भजनी बुवा अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला दानशूर भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकुर कीर, तालुका भंडारी समाज संघ अध्यक्ष राजीव कीर, पतितपावन मंदिर संस्था रत्नागिरी अध्यक्ष उन्मेश शिंदे, रोहिदास समजाचे एस. बी. खेडेकर, तेली समाजाचे रघुवीर शेलार, राधाकृष्ण मंदिर वैश्य समाजाचे राजन मलुष्टे, त्वष्टा कासार समाजाचे अनिल पोटफोडे, मराठा समाजाचे सुधाकर सावंत, कुणबी समाजाचे रामभाऊ गराटे, परीट समाजाचे राजेंद्र नेरकर, कुंभार समाज बावा साळवी, पांचाळ सुतार समाजाचे भगवान सुतार, भोई समाजाचे जयप्रकाश भालेकर, शिंपी समजाचे विजय पाडाळकर, नाभिक समाजाचे प्रकाश हातखंवकर, धनगर समाजाचे अनंत आखाडे, खारवी समाजाचे दामोदर लोकरे, लिंगायत समाज, गाबित समाजातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

त्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांमध्ये आशिष हातिसकर, जयवंतबुवा बोरकर, वसंत लिमये, सुहास भोळे, दिलीप रेडकर, सुरेंद्र घुडे, माणिकराव सातव, सुनील भोंगले, कौस्तुभनागवेकर, गणेश धुरी, नवनीत कदम, नितीन तळेकर आदींचा सत्कार करण्यात आला.

संत गाडगेबाबा, श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी सकल हिंदू समाजातील विविध ज्ञातीच्या लोकांना एकत्रित करून सहभोजनाला सुरुवात केली होती. त्याच धर्तीवर गेली चार वर्षे हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. समाजातील सर्व ज्ञातीच्या लोकांचा एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रम यावेळी झाला. त्यानंतर विविध भजनी बुवांचा सहभाग असलेल्या भजनाच्या गजरातून भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. दरम्यान मंदिरात आयोजित सहभोजनाचा आणि सहभजनाचा लाभ समस्त रत्नागिरीकरांनी घेतला. प्रस्तावना चंद्रहास विलणकर, त्यानंतर तालुका भंडारी समाज संघ अध्यक्ष राजीव कीर, पतितपावन मंदिर संस्था रत्नागिरी अध्यक्ष उन्मेश शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 25/Feb/2025