चिपळुणात आज विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने मंगळवार, दि. २५ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजने व लोकार्पण सोहळ्यासह मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा व ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मराठी भाषा, उद्योग व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत तसेच गृह (शहर) राज्यमंत्री, महसूल, ग्रामविकास, पंचायतराज, अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सर्व कार्यक्रम होणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खा. नारायण राणे, खा. सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड, आ. भास्कर जाधव, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित राहाणार आहेत.

सोहळ्यांतर्गत राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत कोळकेवाडी धरणातील ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा करणे, ना. स्व. स्था. संस्था परिक्षेत्र विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे योजनेंतर्गत मार्कंडी श्री स्वामी समर्थ मठ ते रामेश्वर मंदिरपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, उक्ताड येथे कै. सदाशिव गोपाळ भोसले खेळाचे मैदान विकसीत करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर नूतनीकरण व विकास आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत गोवळकोट येथे खेळाचे मैदान विकसित करणे, शहरातील विविध ठिकाणी ओपन जिमचे साहित्य बसविणे, जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सोलर पॅनेल बसवून कार्यान्वित करणे, नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पाग येथील बगिचासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह इमारत विकसित करणे आणि न. पा. फंड अंतर्गत साने गुरुजी उद्यान येथे कवी माधव यांचे शब्दशिल्प बसविणे, खेंड पिंपळ गणेश मंदिराजवळ कवी कै. मा. वामनराव साडविलकर यांचे शब्दशिल्प बसविणे आदी झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा तर मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते पुस्तक प्रकाशन सोहळा अ. भा. नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्या माध्यमातून तसेच स्वा. वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘सागरा प्राण तळमळला’ हे दोन अंकी नाटक असे विविध कार्यक्रम मंगळवार २५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 25/Feb/2025