रत्नागिरी : येथील अ. के. देसाई हायस्कूल आणि हॉकी रत्नागिरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत देसाई हायस्कूलने अव्वल कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले.
मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या मैदानावर जिल्हास्तरीय पहिली हॉकी स्पर्धा रंगली. यावेळी विद्यावर्धिनीचे उपाध्यक्ष संतोष नालावडे, हॉकी रत्नागिरीचे अध्यक्ष प्रशांत साळुखे, उपाध्यक्ष सचिन मटकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी, निखिल कोळवणकर, सागर पवार, तुफील पटेल, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाभरातील शाळांचे क्रीडाशिक्षक, नियोजन समितीचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
देसाई हायस्कूलचे माजी क्रीडाशिक्षक के. नारायण कृष्णाजी बाईंग यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव बाबा बाईग यांच्या सौजन्याने तसेच अरुण जाधव, स्वराज्यसेवक सुरेश राडघे यांच्या स्मरणार्थ स्वराज्य संस्था व चंद्रकांत राज्ये यांनी स्पर्धेसाठी चषक दिला. प्रथमच झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत देवरुख, पाली, लांजा, रत्नागिरी येथून २० संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये मुलींचे सात संघ सहभागी झालेले होते.
पंच म्हणून सागर पवार, निखिल कोळवणकर यांनी काम पाहिले. बाद पद्धतीने खेळवलेल्या या सामन्यात १७ वर्षांखालील मुली गटात मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या संघाने विजेतपद पटकावले तर याच हायस्कूलच्या दुसऱ्या संघाने उपविजेतेपद पटकावले, १७ वर्षांखालील मुलांमध्ये मीनाताई ठाकरे विद्यालय देवरुख संघ विजयी इशता. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस् क्लब देवरुख उपविजेते झाले. पुरुष खुल्या गटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस् क्लबचा बी संघ विजय झाला. त्याच स्पोर्टस् क्लबचा संघ उपविजेता ठरला.
पारितोषिक वितरणाला माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, माजी क्रीडाशिक्षक शहाजी भोसले, क्रीडाप्रेमी बाबा बाईंग, योगशिक्षिका ज्योती गावंड, माजी मुख्याध्यापक शिवाजी सुतार, हॉकी रत्नागिरीचे अध्यक्ष प्रशांत साळुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. देसाई हायस्कूलमध्ये हॉकीचे केंद्र निर्माण होत आहे. ही हॉकी खेळासाठी एक चांगलो गोष्ट आहे, असे मत कोळवणकर यांनी व्यक्त केले. तसेच गावंड यांनी हॉकी स्पर्धेबाबत संयोजकांचे अभिनंदन केले. खेळामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. या खेळामध्ये चपळता आणि बॉडी फिटनेसला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी खेळ नियमितपणे खेळा. भविष्यात या खेळांचा अधिक प्रसार व्हावा, असे त्यांनी सांगितले.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. या खेळाचा सर्वांनी सन्मान करावा. या प्रकारच्या स्पर्धेमुळे हॉकी खेळाचा प्रसार होईल. हॉकी खेळाची आवड वाढीस लागून अनेक खेळाडू घडतील, हेच खेळाडू पुढे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर हॉकी स्पर्धेत सहभागी होतील आणि देशाचे नाव मोठे करतील. – योगेश पवार, अध्यक्ष, मराठा मंदिर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:44 PM 25/Feb/2025














