रत्नागिरी : ‘संगीत बिबट’ मधून वनविभागाची जनजागृती

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत असून, वन्यजीवांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे ते पटवून देण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. बिबट्यांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले असून, बिबट्यांविषयी जनजागृतीसाठी संगीत बिबट आख्यान हे संगीत नाट्य सादर करण्यात येत आहे.

रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या संकल्पनेतून, वन विभाग रत्नागिरी चिपळूण व डब्लूसीएस-इंडिया, रेनमॅटर फाऊंडेशनतर्फे या संगीत बिबट आख्यान संगीत नाट्याचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे श्री क्षेत्र मार्लेश्वर वाहनतळ परिसर, सकाळी १० ते १ यावेळेत होणार आहे. स्थानिक गावकरी, विद्यार्थी, निसर्ग प्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वन विभाग रत्नागिरी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी वन विभागाच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, डब्लूसीएस-इंडियाच्या संचालक डॉ. विद्या अत्रेय, मानव-वन्यजीव सहसंबंध विभागाचे मॅनेजर निकीत सुर्वे, दीप्ती हमरसकर आणि अक्षय मांडवकर यांचे सहकार्य लाभले आहे.

कोकणातील तरुणांकडून नाटकाची निर्मिती
कलेच्या माध्यमातून वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी सिताई क्रिएशन्सने वन्यवाणी ही चळवळ सुरू केली आहे. त्यामधील संगीत बिबट आख्यान ही एक नाट्याकृती आहे. या नाट्याकृतीच्या निर्मिती कुणिका बनसोडे-सावंत या असून, लेखक-दिग्दर्शनाची धुरा मकरंद सावंत यांनी सांभाळली आहे. कोकणातील तरुणांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

Amey jwelrs

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 26/Feb/2025