‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’; ३२ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, पहिल्या टप्प्यात १७ लाख कर्जखात्यांची यादी प्रसिद्ध
मुंबई (विशेष बातमीदार): Shetkari Karj Mukti Yojana 2026 अंतर्गत महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत अत्यंत प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे सक्त निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत दिले आहेत.
मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात सहकार आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हेदेखील उपस्थित होते.
३२ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा: महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ अशा तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. या माध्यमातून राज्यातील सुमारे ३२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, तर नियमित कर्ज भरणार्या २४ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात १७ लाख कर्जखाती: योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १७ लाख (१६.९६ लाख) कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांची ७.०३ लाख तर व्यापारी बँकांची ९.९३ लाख कर्जखाती समाविष्ट आहेत. तर दुसरी यादीही पुढील १५ दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तक्रार निवारण आणि थकबाकीवर तोडगा: व्यापारी बँकांमधील एनपीए (NPA) खात्यांवरील रकमेतील तफावतीबाबत स्पष्टीकरण देताना सहकार सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले की, पोर्टलमधील ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकीची रक्कमच ग्राह्य धरली जाईल. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज न आकारण्यास बँकांनी संमती दिली आहे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास ते पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात, ज्याचे निवारण थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल.
अशी असेल कर्जमुक्तीची प्रक्रिया:
- आधार प्रमाणीकरण: रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे.
- डीबीटीद्वारे जमा: ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल.
- नवीन पीककर्ज: कर्जमुक्तीनंतर ‘कर्ज बेबाकी प्रमाणपत्र’ देऊन आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीककर्ज दिले जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 30-07-2026














