विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
मुंबई : Maharashtra Weather Update संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, विशेषतः विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
विदर्भात मुसळधार; यवतमाळ अन् अमरावतीला रेड अलर्ट: विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून पावसाचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. याशिवाय वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील २४ तास विदर्भातील या सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून १ ऑगस्टपासून पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याला थेट रेड अलर्ट: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठीही हवामान खात्याने थेट रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी शेतात झाडांचा किंवा विजेच्या खांबांचा आसरा न घेता सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोकणात पावसाला वाऱ्याचा अडथळा; गोंदियात वादळाचा तांडव: दुसरीकडे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात सध्या ताशी ४० ते ४५ किमी वेगाने वारे वाहत असून पावसापेक्षा वाऱ्याचाच जोर अधिक पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बांध परिसरात अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक घरांची छपरे उडून गेली, झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले असून गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 30-07-2026














