रत्नागिरी : सध्या मूत्राशयासंबंधित समस्या वाढू लागल्यामुळे डायलिसिसची अधिकाधिक आवश्यकता भासत आहे. त्या दृष्टीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिशय उत्कृष्ट आणि सुसज्ज अशा या कक्षात मिळणाऱ्या या मोफत सेवेमुळे रुग्णांकडील हजारो रुपयांची बचत होत आहे. चिपळूण येथील नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अमेय बेडेकर या विभागाची धुरा सांभाळत आहेत.
रत्नागिरीत डायलिसिस सुविधा उपलब्ध नाही; मात्र ही सुविधा नसल्याने येथील रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन हजारो रुपये खर्च करून सुविधा घ्यावी लागत होती. सामान्य रुग्णांना हे परवडणारे नव्हते. अखेर आरोग्य विभागाने २०१३ ला येथील सामान्य रुग्णालयात सामान्य आजारांच्या रुग्णांसाठी ४ आणि पॉझिटिव्ह रुग्णांसाठी १ अशा पाच खाटांची डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिली; मात्र त्या वेळी आवश्यक तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने ही सेवा निरंतर देण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्या अडचणींचेही आता निराकारण करण्यात आले आहे.
सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आता १६ खाटांचा सर्व सुविधांनीयुक्त असा अद्ययावत डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला आहे. यापैकी दोन खाटा पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आणि १४ अन्य रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. चिपळूणचे नॅफ्रॉलॉजिस्ट डॉ. बेडेकर सध्या या विभागात पंधरा दिवसातून एक दिवस सेवा देतात. इतर दिवशी ते चिपळुणात असले तरीही डायलिसिस विभागातील तांत्रिक अधिकारी शुभम शेट्ये, सागर लिंगायत, श्रद्धा बेर्डे तसेच परिसेविका शर्मिष्ठा पाडावे आणि अधिसेविका दिव्या कोळेकर आणि आदिती पायरे डॉ. बेडेकर यांच्याशी फोनवरून संपर्कात असतात. सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत या विभागाची धुरा सांभाळत असतात. काहीवेळा तातडीची सेवाही ही मंडळी देत असतात. सामान्य रुग्णालयात ही अत्याधुनिक महाग सेवा अगदी मोफत आणि उत्कृष्ट मिळत असल्याने सामान्यांना न पेलवणारा हजारो रुपयांचा खर्च वाचला आहे. त्यामुळे या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 26-02-2025














