पावस : ओल्या काजूगराला हजार ते बाराशे रुपये किलो दर

पावस : हापूस आंब्यापाठोपाठ पावस परिसरामध्ये काजू पिकही समाधानकारक आले आहे. सध्या काजू बी ला दीडशे रुपये किलो दर मिळत असून, ओल्या काजूगराला चांगली मागणी असून हजार ते बाराशे रुपये किलो दर मिळत आहे.

पावस पंचक्रोशीत हापूस आंबा व काजूचे समाधानकारक उत्पादन आले असून, बागायतदारांनी आंबा काढणीस सुरुवात केली आहे. आंब्यापाठोपाठ काजू हंगामही सुरू झाला असून, बाजारपेठेत ओले काजूगर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याला दरही चांगला मिळत असल्याने ग्रामीण भागातून महिला ओले काजूगर घेऊन विक्रीसाठी येत आहेत.

सध्या किलोला हजार ते बाराशे असा दर मिळत आहे. सुक्या बी ला दीडशे रुपये दर मिळत आहे; परंतु काजू बीची आवक वाढल्यानंतर हा दर घसरण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेतकरी अनिल बिर्जे म्हणाले, हापूस आंबा व काजू बी ला सुरवातीला दर चांगला मिळतो; परंतु कालांतराने आवक वाढल्याने दर घसरतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते. यासाठी हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 26/Feb/2025

Shoping fest Khabardar