दापोली : शार्क म्हणजेच मुशी, पाकट म्हणजेच स्टींग रे, जायन्ट गिटारफीश, सॉफिश या सागरी मत्स्यप्रजातीचा ‘इस्लामोब्रान्च’ कुळात समावेश होतो. आययूसीएनने जगातील ‘इस्लामोब्रान्च’ कुळातील ३१६ प्रजाती संकटात सापडल्याचे म्हटले आहे.
भारतातील एकूण ५१ समुद्री मत्स्यप्रजाती विलुप्तीच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आययूसीएनच्या शार्क स्पेशालिस्ट ग्रुपने आजवर १२५ क्षेत्रांना इस्त्राची ओळख दिली आहे. यामध्ये आता केळशी-उंटबर आणि मालवणच्या सागरी परिक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. ‘इस्त्रा’ची ओळख प्रामुख्याने बंदरावर वाहून आलेल्या शार्क, पाकट आणि गिटारफीशची संख्या पाहून पटवली जाते. मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अनावधाने अडकलेले हे जीव मच्छीमारांकडून बंदरांवर आणले जातात. कोणत्या बंदरावर असे जीव वाहून आल्याची संख्या जास्त आहे, याचे सर्वेक्षण करुन ‘इस्त्रा’ची ओळख पटवली जाते.
केळशी-उंटबर या क्षेत्राची ओळख ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया’च्या टीमने केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बंदराचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना केळशी-उटंबर येथील मासळी उतरवण्याच्या धक्क्यावर सर्वाधिक ‘संकटग्रस्त’ शार्क आणि गिटारफीशच्या प्रजाती आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी या जागेची निवड करुन तसा प्रस्ताव ‘आययूसीएन’च्या ‘शार्क स्पेशालिस्ट ग्रुप’ला पाठवला. हा प्रस्ताव मान्य करुन ग्रुपने या क्षेत्राला ‘इस्रा’ क्षेत्र म्हणून नामांकित केले आहे. केळशी-उटंबर येथे ‘शार्पनोज गिटारफिश’ आणि ‘वाइडनोज गिटारफिश’ या दोन प्रजाती प्रामुख्याने आढळून आल्या.
महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही प्रजाती ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या’ अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहेत. म्हणजेच त्यांना वाघाऐवढे संरक्षण आहे. तसेच ‘आययूसीएन’च्या लाल यादीत या दोन प्रजातींचा समावेश ‘नष्टप्राय’ प्रजातींच्या यादीत करण्यात आला आहे. मालवणमध्ये ‘लाँगहेड ईगल रे’ ही ‘संकटग्रस्त’ आणि ‘वाइडनोज गिटारफिश’ ही ‘नष्टप्राय’ प्रजात आढळून आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 26/Feb/2025














