रत्नागिरी : जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा

रत्नागिरी : महाशिवरात्रीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पुरातन शिवमंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील वातावरण शिवमय झालेले होते. गावागावांमधील शंकरांच्या मंदिरात हर हर महादेवचा जयघोष सुरू होता.

रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराची महापूजा मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यजमान म्हणून विराज घोसाळकर, सौ. राजवर्धिनी घोसाळकर, सम्राज्ञी घोसाळकर व तनिष्का घोसाळकर यांनी भगवान शंकराची षोड्शोपचारपूर्वक पूजा केली. अभिषेक, बेल अर्पण व आरती आदी धार्मिक कार्येही केली. या वेळी पुरोहित सुयश तेरेदेसाई, विश्वस्त नित्यानंद दळवी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील गणपतीपुळे मार्गावरील ऐतिहासिक नेवरे गावातील श्री देव वाडेश्वर या देवस्थानात काल महाशिवरात्री उत्सव झाला. एक ऐतिहासिक संदर्भ लाभलेले देवस्थान म्हणून त्याची ओळख आहे.

हे देवस्थान सुमारे १४०० वर्षांपूर्वीचे पुरातन आहे. आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमंत सौ. राधाबाई यांचे ते आराध्य दैवत असल्याचे संदर्भ आहेत. त्यांनी १८व्या शतकात या देवस्थानचा प्रथम जीर्णोद्धार केला. त्यानंतर २०१० मध्ये या देवस्थानचा दुसरा जौणर्णोद्धार झाला. महाशिवरात्रीनिमित्त या देवस्थानात उल्हास घोसाळकर व उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते भगवान शंकराची पूजा करण्यात आली. तसेच रत्नागिरी शहराजवळील राजीवडा येथील सुप्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीचा उत्सव झाला. भगवान शंकराळ्या दर्शनासाठी या मंदिरात सकाळपासूनच भाविकांची रांग लागली होती.

मंदिरात महाशिवरात्रानिमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हजारों भाविकांनी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा तसेच तीर्थप्रसादाचा लाभघेतला.

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील समुद्रकिनारी असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू होता. काळबादेवी येथील श्री देव रामेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. लाखो भाविकांची श्री देव रामेश्वरावर नितांत श्रद्धा असून, भाविक या मंदिरात विविध सणांच्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. धोपेश्वर येथील श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्र यात्रोत्सव मोठ्या उत्साही व धार्मिक वातावरणामध्ये पार पडला. या वेळी मंदिरात झेंडूच्या फुलांनी केलेली आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्रोत्सवानिमित्त संस्थान श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकम पार पडत आहेत. उत्सवकाळातील पारंपरिक वाद्य, नित्यपूजा, श्रीवर रुद्राभिषेक, महापूजा, महानैवेद्य, श्रींचा शयनकाल, श्रींना फलाहार अर्पण, मंत्रपुष्प, पुराण, गायन, कीर्तन, भोवती, आरती आदी कार्यक्रमांनी गेले तीन-चार दिवस संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला असताना आज महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. आज पहाटे नित्यपूजेने महाशिवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर श्रींवर रूद्राभिषेक तसेच भजन, कीर्तन आदी कार्यकम दिवसभरात पार पडले. यात्रेनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

तालुक्यात उत्साहात कार्यक्रम
संगमेश्वरः संगमेश्वर तालुक्यातील पुरातन व चालुक्य राजवटीतील मंदिरातून बुधवारी शिवशंभोचा गजर घुमला. तसेच राजवाडीतील सोमेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कसबा येथे चालुक्य राजवटीतील पुरातन कार्णेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली गेली. याहीवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरामध्ये फुलांची आरास करण्यात आली होती. त्याचप्रमाणे कळंबस्ते येथील रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त येथे कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळपासूनच या मंदिरातून भाविकांनी गर्दी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 27/Feb/2025