गावखडी येथील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव

पावस : ओम नमः शिवाय… ओम नमः शिवाय… असा मंत्रोच्चाराचा जप करत… अपूर्व उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिरात उभारलेली अकरा खांबांच्या एकवीस पायली तांदळाची पूजा उत्सवाचे खास आकर्षण असते.

गावखडी येथील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री उत्सव मंगळवारपासून (ता. २३) मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू झाला. श्रीदेव रामेश्वर देवस्थान, शिवरात्र महोत्सव समिती गावखडीचे सर्व पदाधिकारी आणि श्रीदेव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समितीचे सभासद, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाच दिवस शिवरात्र महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा खांबांची व एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात येते. ही महापूजा बांधण्यासाठी काही भक्तगण तांदूळ देतात. अशी महापूजा इतरत्र पाहावयास मिळणे दुर्मीळ आहे. ही तांदळाने बांधलेली महापूजा हे भक्तगणांचे आकर्षण असते. गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर नवसाला पावणारी असल्यामुळे लाखो भाविक येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त नतमस्तक होतात. श्रीदेव रामेश्वर तुझी कृपा सदा आम्हावरी राहूदे, असे साकडे भाविकांनी घातले. श्रीदेव रामेश्वर मंदिरात दिव्यांग, वयोवृद्धांना सुलभ दर्शनासाठी जाता यावे, यासाठी सुनियोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 27/Feb/2025