रत्नागिरी : आपल्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात ज्या सेवाभावाने कार्य केले, तो सेवाभाव स्वतःच्या वयाच्या नव्वदीतही जपण्याचे कार्य साईनगर-कुवारबाव (ता. जि.रत्नागिरी) येथील शांताराम सीताराम देशपांडे करत आहेत. आपले वडील कै. सीताराम नारायण देशपांडे (भाऊसाहेब) यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त श्री. देशपांडे यांनी आपल्या घरी मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू केले आहे.
या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी उपसरपंच नरेश विलणकर यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सदस्य सौ. विलणकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी श्री. देशपांडे, त्यांचे पुत्र अॅड. प्रसाद देशपांडे, सूनबाई सौ. समृद्धी देशपांडे, डॉ. सौ. प्राची यादव, यशवंत (भाई) धुपकर, विश्वनाथ केळकर, शुभांगी यादव आदी उपस्थित होते.
सुखाई आरोग्य सेवा आणि समुपदेशन केंद्र या नावाने सुरू झालेल्या या केंद्रात गरीब-गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोफत समुपदेशन सेवा पुरवली जाणार आहे. या केंद्रात डॉ. सौ. प्राची यादव आरोग्य सेवा देणार आहेत. वर्षभर दर मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळांमध्ये हे मोफत आरोग्य केंद्र सुरू राहणार आहे.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शांताराम देशपांडे म्हणाले, ‘माझे वडील कोर्टात नोकरीला होते. त्यांना वाचनाचा मोठा छंद होता. ते संस्कृत उत्तम बोलत. नोकरीच्या वेळानंतर ते लायब्ररीत वाचन करायचे, तसेच विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सेवा म्हणून केले. त्यांच्याप्रमाणे सेवेचा थोडासा खारीचा वाटा आपण उचलतोय याचा मला आनंद आहे. ते हिमालय आहेत, मी अजून पायथ्याला आहे. या मोफत आरोग्य सेवा केंद्राचा फायदा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.’
विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि अभ्यासिकेचा प्रकल्प सुरू करण्याचाही विचार देशपांडे यांनी व्यक्त केला. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत देशपांडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला होता. वयाच्या नव्वदीत असूनही त्यांची प्रकृती ठणठणीत असून, उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम ते राबवत असतात, अशी माहिती त्यांचे पुत्र आणि सूनबाई यांनी दिली.
आरोग्य केंद्राचा पत्ता असा : सुखाई आरोग्य सेवा आणि समुपदेशन केंद्र, श्री. शांताराम सीताराम देशपांडे, २/५६, आयटीआय गृहनिर्माण संस्था, साई मंदिराच्या मागे, आरटीओ ऑफिसजवळ, साईनगर, कुवारबाव, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 27-02-2025














