सावर्डेत थांबा सोडून एसटी थांबते दूरवर

सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथील मुख्य मार्ग निवाऱ्यासमोर एसटी बसगाड्या न थांबता शंभर मीटर मागे थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मार्ग निवारा असूनही उन्हात बसगाड्यांची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. मार्ग निवाऱ्यासमोरच एसटी बसगाड्या थांबवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सावर्डे येथे महामार्ग चौपदरीकरणात जुना बसथांबा पाडण्यात आला असून, रस्त्याच्या दुतर्फा नव्याने मार्गनिवारे सेवारस्त्याच्या बाजूला बांधले आहेत. एसटी बसगाड्या सेवारस्त्यावरून न धावता महामार्गावरून धावताना दिसतात. परिणामी, प्रवाशांना नाईलाजाने महामार्गाच्या कडेला उभे राहून गाड्यांची वाट पाहावी लागत आहे.

या गाड्या महामार्गावरून सुस्साट जात आहेत. त्यामुळे प्रवासी क्वचितच मार्गनिवाऱ्यात बसलेले दिसतात. हे मार्गनिवारे शोभेचे बनले आहेत. चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या बसगाड्या, तर सावर्डेत आल्यानंतर मार्गनिवाऱ्यासमोर न थांबता शंभर मीटर मागेच उभ्या राहात आहेत. त्यामुळे प्रवाशांना या निवाऱ्याचा फारसा उपयोग होत नाही. ज्या हेतूने निवारे बांधले आहेत त्याच्या हेतूलाच त्यामुळे बाधा आली आहे.

वरिष्ठ एसटी बस अधिकाऱ्यांनी संबंधित एसटी चालक वाहकांना मार्गनिवाऱ्यासमोरच एसटी बसगाड्या थांबवण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून मार्गनिवाऱ्याचा वापर प्रवाशांना करणे शक्य होईल. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी मार्गनिवारे हे प्रवाशांच्यादृष्टीने खूप गरजेचे आहेत.

Tata safari

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 28/Feb/2025