Ratnagiri : थिबा पॅलेसवर थ्रीडी मल्टिमीडिया शोची चाचणी यशस्वी

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी सातत्याने लक्ष घालणार्‍या पालकमंत्री उदय सामंत यांनी डोळ्यासमोर ठेवलेल्या काही महत्वाच्या प्रकल्पांपैकी थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टी मीडिया शोचे काम पूर्ण झाले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या शोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजकांना काही बदल सुचविले असून, लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द धार्मिक पर्यटन स्थळ असणार्‍या गणपतीपुळे येथे लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात, त्यातील हजारोपर्यटक रत्नागिरी शहरातही येऊन जातात. मात्र हे पर्यटक रत्नागिरीत थांबल्यास त्याचा लाभ रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला होणार आहे. त्यामुळे ना. उदय सामंत यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारली. थिबापॅलेस येथील बागेचे नुतनीकरण करण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला. शहरातील मुख्य रस्त्यालगत भव्य अशी पांडुरंगाची 30 फूटी मूर्ती उभारली. यासह ध्यान केंद्राचे काम सुरु असून, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उभारण्याचे कामही सुरु आहे. मिर्‍या येथील बंधार्‍याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

ब्रह्मदेशाचा शेवटचा राजाथिबा याचे निवासस्थान असलेला थिबा पॅलेसही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असून, याठिकाणी थ्रीडी मल्टी मिडिया शोचे उभारणी करण्यात आली आहे. गेले वर्षभर याठिकाणी काम सुरु होते. हे काम पूर्ण झाले असून, रत्नागिरीकरांसह पर्यटकांना एक अभूतपूर्व असा कार्यक्रम मल्टी मिडिया शोच्या रुपाने पाहता येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या थ्रीडी मल्टी मिडिया शोची चाचणी घेण्यात आली. यावेळी ना. सामंत यांनी हा प्रकल्प तयार करणार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असून काही बदलही सूचवले आहेत. मराठी बरोबरच हिंदी व इंग्रजीमध्ये हा शो असणार आहे. लवकरच याचे लोकार्पण होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 28-02-2025