पावस : सध्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील गणेश पाटील यांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून पाच हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये रवाना केल्या. प्रत्येक पेटीला साडेआठ हजार रुपये दर मिळाला आहे. त्याबद्दल आंबा बागातदार यांनी समाधान व्यक्त केले.
यावर्षी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे हापूस आंबा पिकाला चांगली गती प्राप्त झाल्याचे चित्र पावस परिसरामध्ये दिसत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच गोळप, पावस, गणेशगुळे आदी गावांमधून टप्प्याटप्प्याने हापूस आंब्याच्या पेट्या रवाना होऊ लागल्या आहेत. सध्या हापूस आंब्याचे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांनी तयार झालेल्या आंब्याच्या पेट्या पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सध्या चांगला दर मिळत आहे.
या भागातून मुंबई, अहमदाबाद, पुणे या ठिकाणी आंबा बागायतदार हापूस आंब्याच्या पेट्या पाठवत आहेत. चांगल्या तऱ्हेचे फळ काढून बाजारामध्ये पाठवले जात असल्यामुळे सध्या दर चांगला मिळत आहे. शिवार आंबेरे येथील अंबा बागायतदार गणेश पाटील यांनी महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून पाच पेट्या पूजा करून वाशी मार्केटला पाठवल्या. दलालाने त्यांना साडेआठ हजार रुपये दर दिला आहे.
दरवर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये चांगले फळ तयार झाल्यानंतरच बाजारामध्ये विक्रीकरिता पाठवतो. चांगल्या तऱ्हेने तयार फळ पाठवल्यामुळे चांगला दर मिळतो. आम्ही घरातील सर्व लोक विशेष लक्ष देतो. त्यामुळेच बाजारामध्ये आमच्या मालाची विक्री चांगल्या प्रकारे होते आणि दरही चांगला मिळतो – गणेश पाटील, बागायतदार, शिवारआंबेरे
हापूसच्या पेट्यांमध्ये तिप्पट घट
यंदा हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब होणार हे निश्चित आहे. मुंबईतील वाशी बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून दोन ते अडीच हजार पेटी हापूस वाशीत पाठविला जात आहे. त्यात रत्नागिरीतील पेट्यांचे प्रमाण नगण्य आहे. अधूनमधून पेट्या पाठविल्या जातात. बाजारात दरही पेटीला ६ ते १० हजार रुपये मिळत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम हापूसवर दिसत असून, त्याचा फटाक आंबा व्यावसायिकांना बसणार आहे. गतवर्षी याच कालावधीत दररोज ५ हजारांहून अधिक पेट्या कोकणातून जात होत्या. मात्र, दर २ ते ५ हजार रुपये होता, असे वाशीतील व्यावसायिक संजय पानसरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 03/Mar/2025














