एसटी आगारातील ‘त्या’ बस १५ एप्रिलपर्यंत भंगारात : परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई : पुणे येथील स्वारगेट स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेल्या स्क्रॅप पॉलिसीनुसार सर्व एसटी आगारातील भंगारात काढण्याची गरज असलेल्या बस येत्या १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

पुण्यातील घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या अनुषंगाने शनिवारच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला. मिसाळ यांनी सांगितले, की एसटीमध्ये पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील. पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यांची संख्यादेखील आता वाढविण्यात येईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे, त्या तत्काळ करणार असल्याचे सांगताना या प्रकरणाच्या ऑडिटमध्ये दोषी अधिकारी किंवा ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार आहोत.

राज्यातील सर्व एसटी बसस्थानकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक राज्यात दिला जाईल. खासगी बसचालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठीदेखील उपाययोजना आखण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 03/Mar/2025