राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याच्या लोकवस्तीतील बिनधास्त वावराने लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. याचा पडताळाच मिळताना वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा लोकवस्तीमध्ये वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीश म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्री आल्याचे त्यांच्या घरपरिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
गेल्या काही वर्षापासून शहरामध्ये बिबट्याचा राजरोस तालुक्याच्या ग्रामीण भागासह वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षापूर्वी तर शहरासह ग्रामीण भागामध्ये पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या बिबट्याने वाहनचालकांवर रात्री हल्ला करून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवळ परिसरामध्ये सातत्याने गोठ्यामध्ये घुसून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना हल्ला करून बिबट्याने नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत.
लोकवस्तीतील बिबट्याच्या या बिनधास्त वावराने सर्वसामान्यामध्ये दहशत निर्माण केली आहे तर, दिवसाढवळ्या शेतशिवारामध्ये तर, रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिनधास्त येऊन पाळीव जनावारांना बिबट्याकडून हल्ला होऊन नुकसान केले जात असल्याने शेतकरीही भयभीत झाला आहे.
रात्री एकट्याने बाहेर पडणे ग्रामस्थांचे मुश्किल झाले आहे. मात्र, बिबट्याचा अद्यापही बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यांच्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशातच, तालुक्यातील वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.
वहदहसोळ परिसरामध्ये बिबट्याचा वावर असून, आपल्या घरपरिसरामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये गेले दोन दिवस बिबट्या घराच्या अंगणामध्ये आल्याचे दिसून आले आहे. वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात. गिरीष म्हादये, वडदहसोळ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 04/Mar/2025














