रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमा नुसार सर्व पोलिस घटकांना नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलिस कवायत मैदान, पोलिस मुख्यालय येथे जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन झाला. यामध्ये ५४८ तक्रार अर्जापैकी ५४७ अर्जांचे निरसन करण्यात आले असून, एका अर्जामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
या वेळी जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्ष येथील भरोसा सेल येथे प्राप्त एकूण सात अर्जामधील अर्जदार व गैरअर्जदारांना अर्ज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीकरिता एकूण पाच पॅनेल नेमण्यात आली होती. ज्यामध्ये एकूण पाच पोलिस अधिकारी, सात महिला पोलिस अंमलदार, पाच भरोसा सेल व महिला सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य यांचा समावेश होता.
या पॅनलमार्फत अर्जदार व गैरअर्जदार यांना समुपदेशन करून अर्जदार व गैरअर्जदार यांच्या कौटुंबिक स्तरावरील प्राप्त तक्रारीबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यामधील वादविवाद मिटवण्यात यश आले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी उपस्थित अर्जदार व गैरअर्जदार यांना कौटुंबिक वाद व त्यातून होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. या जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने एकूण ५० अर्जदार व गैरअर्जदार असे उपस्थित होते.
समुपदेशनाचा फायदा
तक्रार निवार दिनानिमित्त दाखल तक्रारीचे निवारण करण्यासाठी पाच पॅनेल नेमण्यात आली होती. त्या पॅनेलद्वारे आवश्यक त्या ठिकाणी अर्जदारांसह संबधितांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे अनेक घरगुती तंटे जागेवर मिटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 06-03-2025












