संगमेश्वर : तुळसणी सुर्वेवाडीत आढळले दोन बछडे

देवरूख : पाणी साठवण करण्यासाठी तयार केलेल्या एका हौदात बिबट्याचे दोन बछडे सापडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडीत बुधवारी दुपारी उघडकीस आली. याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर तीन तासांच्या मोहिमेनंतर बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात घेण्यात आले. ही मोहीम सायंकाळी उशिरा राबविण्यात आली.

देवरूख पांगरी मार्गावरील तुळसणी सुर्वेवाडी येथे शरदचंद्र गीते यांची आंबा काजूची बाग आहे. या येथील झाडांना पाणी देण्यासाठी हौद बांधण्यात आला आहे. सध्या या हौदामध्ये पाणी नाही. बागेत काम करणाऱ्या कामगारांना बुधवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास हौदातून आवाज आला. एका कामगाराला हौदामध्ये बिबट्याचे दोन बछडे दिसले.

वनविभागाला माहिती मिळताच वनपाल तौफीक मुल्ला व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हौदामध्ये पिंजरा सोडला. तीन तासाच्या मोहिमेनंतर बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. याकामी वनविभागाला ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले. पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेले हे बछडे सात ते आठ महिने वाढीचे असल्याचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बछड्यांची तपासणी करणार येणार आहे. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडू, असे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 06/Mar/2025