गुहागर : आम्ही 20-25 वर्षात हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतक-यांनी हळद लागवडीत प्रगती करावी, आम्ही मोकळेपणाने संपूर्ण मार्गदर्शन सातत्याने आपणास करत राहू, असे आवाहन महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त SK-4 हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर यांनी केले.
दरवर्षी प्रमाणे एस.के.-4 गृप तर्फे आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात हळद लागवड ते प्रकिया या बाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की आम्ही आयुष्यातील 25 वर्ष खर्ची करून SK-4 ही हळदीची जात तसेच कोकणातील परिस्थितीत हळद लागवडीचा तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज हे ‘रेडिमेड’ तंत्रज्ञान आपणासमोर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मांडतोय. या ज्ञानाचा उपयोग अवश्य करावा व आपली प्रगती करावी, असेही सचिन कारेकर यांनी सांगितले.
हळद लागवडीला पावसाळ्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत पाणी देणे आवश्यक असल्याचे सांगून जर हे शक्य झाले तरच चांगल्याप्रकारे उत्पादन आपण काढू शकतो. नाहीतर उत्पादनावर परिणाम होतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. पाण्यात विरघळणा-या रासायनिक खताचा तसेच जिवामृतच्या वापराने हळदीचा गड्डा पोसण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
या प्रशिक्षणात हळद लागवडीसाठी बियाणे निवड, बियाणे साठवणूक, हळद लागवड, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, किड- रोग नियंत्रण, हळद लागवडीला पावसानंतर चे पाणी व्यवस्थापन, हळद काढणी, कापणीनंतर प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन सचिन कारेकर यांनी केले. यावेळी हळद लागवड, हळद उजळणी, हळद पॉलीश करणे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. पंचायत समितीचे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी ओल्या हळकुंडापासून रोपे तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षणाला उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 10/Mar/2025














