चिपळूण : टेरवमध्ये १४ मार्चला शिमगोत्सव

चिपळूण : तालुक्यातील श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव जल्लोषात व धार्मिक वातावरणात १४ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ, पुजारी हे उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत.

१४ ला कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई मंदिरासमोर होमाची पूजा होईल त्यानंतर पुजारी चांदीने मढवलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवताच्या रूपे लावून मंदिर व होमासमोरील सहाणेवर आसनस्थ करतील. सकाळी ढोलताशांच्या गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलित करून ग्रामस्थ होळीत अग्नीदेवतेस श्रीफळ अर्पण करतील, संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर पालखी नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजतगाजत रात्री मंदिरात आणली जाईल.

छबिन्यावेळी वाडीवाडीतील ग्रामस्थ आकर्षक विद्युत रोषणाईसह रांगोळी काढून फटाक्यांची आतषबाजी करतील व गुलाल उधळून ढोलताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत करून सुवासिनी ठिकठिकाणी ओट्या भरतील. १५ ते २५ मार्च या कालावधीत पालखी रूढी-परंपरेनुसार घरोघरी नेण्यात येईल. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजतगाजत वाडीवाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 11/Mar/2025

Radhakrushna patapedhi