पोदार इंटरनॅशनल स्कूल आयोजित आकाशदर्शन उपक्रमास शहरातील विद्यार्थी आणि पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल,रत्नागिरी तर्फे परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी शाळेच्या भव्य पटांगणावर दुर्बीणतून आकाश दर्शन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सुमारे 500 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमा मधे सहभाग घेतला आणि शुक्र, गुरु,मंगळ या  ग्रहांचे तसेच चंद्राचे दुर्बीणीतून निरीक्षण करून आनंद लुटला. कार्यक्रमा साठी चार दुर्बिणी लावण्यात आल्या होत्या, आणि सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आकाश निरीक्षण केले.

हा कार्यक्रम खगोल अभ्यास केंद्र, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप यांच्या सहकार्याने पार पडला. प्रारंभी प्रा. बाबासाहेब सुतार यांनी पॉवरपॉईंट द्वारे विश्वाच्या शोधात या विषयावर सुमारे अर्धा तास मनोरंजक व्याख्यान दिले.तसेच आकाशाकडे पाहण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी जेष्ठ खगोल अभ्यासक श्री. सुहास गुर्जर यांनी पालकांशी संवाद साधला आणि त्यांना आकाशामधील ताऱ्यांचे साम्राज्य बाबत सखोल मार्गदर्शन केले . त्यांची उपस्थिती हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवून गेली.सर्व उपस्थितांना सुनीता विल्यम्स तसेच इतर अंतराळवीरांना घेऊन फिरणारे स्पेस स्टेशन ही लेझर द्वारे दाखवण्यात आले.अवकाशातील हे नजारे पाहताना सर्वांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले.

खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुपचे श्री व सौ.जागुष्टे आणि त्यांचे सहकारी, यांनी लहानग्याना दुर्बीणीतून ग्रहदर्शन घडवले.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या काही निवडक शिक्षक वर्गानी परिश्रम घेतले त्यांना पोदार इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक श्रिया कांबळे, शुभ्रा पोवार,हराप्रिया केशरी तसेच ऍडमिन स्टाफ राहुल पाटील, अमृता साळवी व चारुता इंदुलकर  यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची आखणी शाळेच्या पोदार प्रेप विभागाच्या मुख्याध्यापिका अस्मिता चोप्रा यांनी केली तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री.राकेश चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

येणाऱ्या काही दिवसातच विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्र संदर्भात शाळेमध्ये काही विशेष कार्यक्रम करण्याचे आवाहन पोदार शाळे तर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 12-03-2025