राजापूर : पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था

राजापूर : नवनव्या संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पोलिसयंत्रणा अधिक गतिमान होत आहे; मात्र पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी पोलिस निवासस्थाने धोकादायक झाली असल्यामुळे अनेकजण भाड्याच्या घरात राहतात. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेऊन दिवसरात्र राबणाऱ्या पोलिसांना निवासस्थाने असूनही बेघरांसारखे भाड्याच्या घरामध्ये राहावे लागत आहे.

तालुक्यात राजापूर आणि नाटे अशी दोन पोलिस ठाणे आहेत. राजापुरात एक पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षकांसह तीन उपनिरीक्षक आणि अन्य पोलिस कर्मचारी मिळून सुमारे ५३ कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी तीन वसाहती आहेत. यामध्ये ब्रिटिशकालीन असणाऱ्या खडपेवाडी व वरचीपेठ अशा दोन वसाहती असून, या दोन्ही ठिकाणी मिळून २६ कर्मचाऱ्यांसाठी खोल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने १९७४-७५ मध्ये भटाळी येथे १६ कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक वसाहत बांधण्यात आली. याच ठिकाणी पोलिस उपनिरीक्षकांसाठी स्वतंत्र निवासस्थान बांधण्यात आले होते. सध्या या सर्व इमारती देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित आहेत. ब्रिटिशकालीन दोन्ही वसाहती आता ढासळत आहेत. भटाळी येथे ३५ वर्षापूर्वी बांधलेली कर्मचारी वसाहतीही दुरवस्था झाली आहे. या तिन्ही वसाहतींची दुरवस्था झाल्याने येथे कुणीही राहात नाही.

राजापूर पोलिस ठाण्याचे कामकाज तहसीलदार यांच्या मालकीच्या इमारतीत सुरू आहे. राजापुर पालिकेने शहरविकास आराखड्यात सुमारे ४० गुंठे जागा पोलिस प्रशासन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी आरक्षित ठेवली आहे. या जागेत प्रशस्त पोलिस कार्यालय इमारत, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने होणे शक्य आहे. त्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला आहे; मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.

नाटेतील पोलिसांचीही अवस्था बिकट
सागरी सुरक्षिततेच्यादृष्टीने नाटे येथे नाटे पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. येथील पोलिस ठाण्याची प्रशस्त व चांगली इमारत आहे. तिथे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाची कोणतीही सोय नाही. या ठिकाणीही दोन अधिकाऱ्यांसह सुमारे ४० ते ४२ कर्मचारी आहेत. त्यांनाही भाड्याच्या खोल्यांचा आधार घ्यावा लागतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 13/Mar/2025