देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथे वाघजाई देवीच्या शिमगोत्सवातील भद्रेचा होम शुक्रवारी सकाळी प्रज्वलित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी पालखी नाचवून आनंद साजरा केला.
प्रतीवर्षाप्रमाणे सकाळी ९.३० वाजता सहाणेवरून पालखीचे पुजारी व भडजी ढोल वाजवत व धुपारती घेऊन होमाच्या स्थळी गेले. या ठिकाणी होमाची पूजा करुन होम प्रज्वलित करण्यात आला.
होम प्रज्वलित होताच सहाणेवरून पालखी उचलून भक्तगणांनी होमाच्या भोवती तीन फेऱ्या मारल्या. यावेळी गावातील नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी देखील होमाला प्रदक्षिणा घातल्या. यानंतर पालखी नाचवण्यात आली.
नंतर ही पालखी सहाणे जवळ आणून भक्तगणांनी दुपारपर्यंत नाचवली. यावेळी छोटी जत्रा देखील भरवण्यात आली होती. दुपारी पालखी पूजा व अभिषेक करून गा-हाणे घालून या कार्यक्रमाची सांगता झाली.
पालखी चतुर्थी पर्यंत सहाणेवर ठेवली जाणार आहे. पंचमीला ही पालखी घरोघरी दर्शनासाठी जाणार आहे. रोज एका एका वाडीत पालखी फिरून झाल्यावर रात्री सहाणेवर आणून ठेवली जाणार आहे. प्रतिदिनी रात्री नमनाचे कार्यक्रम देखील होणार आहेत. सर्व गाव पालखी फिरून झाल्यावर पालखी सहाणेवर आणून चाक काढणे, सर्वांचा मिळून एक जाप घालणे. यानंतर देवीची रूपे उतरवली जाणार आहेत. यावेळी महाप्रसाद देखील होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 15/Mar/2025














