लोटेतील भगवान कोकरेंचे आजपासून बेमुदत उपोषण

◼️ गोशाळेतील ११०० गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

चिपळूण : लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थानच्या गोशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी ४ वेळा उपोषण केले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. गोशाळेतील ११०० गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शासकीय तसेच खासगी मदत देखील मिळत नसल्याने गोशाळेवरील आर्थिक भार वाढतोच आहे. त्यामुळे रखडलेल्या मागण्यांसाठी १७मार्चपासून गोशाळेत आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती भगवान कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भगवान कोकरे म्हणाले, महाराष्ट्रात गाईला राज्यमातेचा दर्जा असताना लाखो गाईंची वाहतूक करून कत्तल केली जाते. त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात. राज्यात प्रतिगोवंश ५० रुपये अनुदान गोशाळांना द्यावे, लोटे परशुराम येथील श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थानच्या गोशाळेतील ११०० गायींचा प्रश्न २ वर्षापूर्वी केलेल्या उपोषणात सोडवण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र अद्याप त्यावर निर्णय नाही. गोशाळेचे मंजूर २५ लाखांचे अनुदान तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देण्याची शिफारस केली असतानाही ते मिळालेले नाही. गोशाळेला व्यावसायिक दरानेच वीजपुरवठा होत आहे. तो शेतीप्रमाणे आकारण्यात यावा. गोवंश हत्या बंदी कायद्यात बैलाला स्थान आहे; मात्र बैलाला अनुदान नसल्याने बैलांचा सांभाळ करणे गाशाळेला कठीण जाते. बैलाला देखील अनुदान मिळाल्यास त्यांची होणारी कत्तल थांबेल. गोशाळेचा दररोजचा खर्च ८० हजार आहे. खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने ५० लाखांचे कर्ज झाले आहे. गाईंना रोज सुमारे ७ टन ओला व सुका चारा द्यावा लागतो. किर्तनसेवेच्या मिळणाऱ्या सेवा शुल्कातून हा खर्च भागत नाही.

शासनाचेच याकामी पुढाकार घ्यायला हवा. याकडे लक्ष वेधण्यासाठी लोटे परशुराम येथील गोशाळेत १७ पासून आमरण उपोषण करणार आहे. या याबाबतचे निवेदनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच पशुसंवर्धन आयुक्तांना दिल्याचे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 17-03-2025