चिपळूण : मांडकी-पालवण येथे विदेशी भाजी लागवड प्रकल्प यशस्वी

रत्नागिरी : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय (मांडकी-पालवण, ता. चिपळूण) येथील चतुर्थ वर्ष कृषीच्या विद्यार्थिनींनी अनुभवात्मक शिक्षण मोड्युलमध्ये प्रथमच झुकिनी या विदेशी फळभाजी लागवडीचे प्रात्यक्षिक घेतले आणि उत्पादन मिळविले.

झुकिनी हे काकडीसारखे दिसणारे फळपीक असून गडद हिरव्या रंगाची लांब भाजी आहे. ही भाजी जेवणासोबत काकडीप्रमाणे सॅलड किंवा कोशिंबिरीसाठी वापरता येते. कमी कॅलरी आणि कमी शुगर असलेले पीक असून शरीरासाठी फायद्याचे असलेले हे पीक आहे. हे पीक लागवडीनंतर केवळ ३० ते ४० दिवसांत काढणीला येते. झुकिनीचे बियाणे सर्वप्रथम प्रो ट्रेमध्ये लावून त्याची चांगली काळजी घेऊन १५ दिवसांनंतर त्याची लावणी केली. त्यानंतर सुमारे ३५ दिवसांत झुकिनी फळे लागायला सुरुवात झाली. झुकिनीला प्रतिकिलो ९० ते १०० रुपये किंमत मिळत आहे. या लागवडीसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्रकल्प इन्चार्ज प्रा. रोशन मोहिरे आणि इतर विषय शिक्षकांचे वेळोवेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 19-03-2025