खेड : केंद्र सरकारने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी गेल्या वर्षीपासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) ऑनलाईन प्रणाली राबवण्यास सुरुवात केली आहे. या प्रणालीसाठी बँक व पोस्ट खात्यात आधारकार्ड मॅपिंग आणि अपडेट न केल्याने ९०० जणं लाभापासून वंचित राहिले होते. त्यातील ४०० जणांच्या त्रुटी दूर केल्या आहेत. त्यांची पेन्शन बँकखात्यात जमा होऊ लागली आहे; मात्र उर्वरित ५०० लाभार्थी ‘अपडेट’ झाले नसल्याने त्यांना अनुदान मिळत नाही.
येथील तहसील कार्यालयाच्या महसूल विभागांतर्गत संजय गांधी योजना विभागामार्फत लाभार्थ्यांना लाभमिळवून देण्यासाठी बिले कोषागार कार्यालयाद्वारे पास करत संबंधित बँक व डाकघर खात्याला धनादेश देऊन त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जात होते; मात्र डिसेंबर २०२४ पासून केंद्र सरकारने या प्रक्रियेत बदल करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑनलाईन या प्रणालीचा अवलंब करून त्या त्या योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान थेट त्यांच्या बचतखात्यात जमा केले जात आहे.
दरम्यान, डीबीटी प्रणाली राबवण्याच्या पहिल्या महिन्यात पाच हजारांहून अधिक लाभार्थ्यांपैकी ९०० जणांना या बदलाचा फटका बसला. बँक व पोस्टातील बचतखात्याला आधारकार्ड मॅपिंग व लिंक करून अपडेट करण्याच्या सूचना केल्या जात असतानाही अनेकांकडून तसे झाले नव्हते. त्यामुळे तहसीलदार सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील संजय गांधी योजना विभागातील अधिकाऱ्यांकडून अपात्र सर्व लाभार्थ्यांना पत्रव्यवहार करून बचतखाते अपडेट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत ४००हून अधिक लाभार्थ्यांनी त्यांचे बचतखाते ‘अॅक्टिव्ह’ करून घेतले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना आधारकार्ड बचतखात्याशी अपडेट झाल्यानंतर अअनुदान जमा होणार आहे. डीबीटी प्रणालीमुळे फेब्रुवारी महिन्याची पेन्शन मार्च महिन्याच्या ६ तारखेला जमा झाली असतानाच मार्च महिन्याचे अनुदानदेखील पाठोपाठ दुसऱ्या दिवशी जमा झाल्याने पेन्शनधारक लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२४ पासून ज्या लाभाध्यर्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान डीबीटीद्वारे खात्यात जमा झालेले नाही, आधारकार्ड अॅक्टिव्ह नाही वा मॅपिंग नाही याबरोबरच अन्य काही अडचणी असल्यास तहसील कार्यालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधावा. सुधीर सोनावणे, तहसीलदार, खेड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 27/Mar/2025














