देवरुख : देवरुख शहराच्या ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवीच्या शिमगोत्सवाची सांगता शनिवारी २९ रोजी रंगपंचमी शिंपणे याने होणार आहे. प्रतिवर्षी देवरुखची रंगपंचमी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला होत असते. यानुसार देवरुखची रंगपंचमी शनिवारी होणार आहे. ग्रामदेवतेची पालखी भक्तांच्या घरोघरी दर्शनासाठी शिमगोत्सवातील होम झाल्यावर दुसऱ्या दिवशीपासून नेली जाते.
देवरुखामील शिमगोत्सव सांगता शनिवारी सायंकाळी होणार आहे. सर्व मानकरी, गावकरी व ग्रामस्थांकडे पालखी दर्शनासाठी नेऊन आणल्यावर हे पालखी शनिवारी सायंकाळी देवीचे पुजारी गुरव यांच्या निवासस्थानी नेण्यात येते या ठिकाणी ओटी भरणे, देवीची चाक काढणे, नवस बोलणे फेडणे असा कार्यक्रम केला जातो. यानंतर एकच मोठे गाऱ्हाणे घालून पालखीची पूजा करून नंतर देवीची रूपे काढली जातात. याचवेळी देवीच्या मंदिरापासून रंगपंचमी म्हणजेच शिंपण्याच्या फेऱ्याला सुरुवात होते.
बैलगाड्या, टेम्पो यामध्ये बॅरल मधून रंग भरून रंगांची उधळण करत हा फेरा मंदिरापासून बाजारपेठ, एसटी स्टैंड, स्टेट बँक रोड, राम मंदिर, शिवाजी चौक, मातृमंदिर, माणिक चौक मार्गे पुन्हा मंदिरापर्यंत नेला जातो.
तत्पूर्वीच सकाळी ११ वाजल्यापासूनच संपूर्ण देवरुख शहरात अबाल वृद्धांना आनंद देणारी रंगपंचमी शहरात सुरू केली जाते. दिवसभर शहरातील नाका नाक्यामध्ये डीजे लावून तरुण वर्ग उत्साहाने नृत्य करत रंगांची उधळण करतात. या रंगपंचमीची सांगता सोळजाई मातेचा फेरा आल्यावर केली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 29/Mar/2025














