खेड : डेंगी आणि मलेरियासारख्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने आता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खेड शहरातील विविध प्रभागामध्ये नुकताच कंटेनर सर्व्हे करण्यात आला.
त्यानुसार वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या जोखीमग्रस्त ठिकाणाची पाहणी करण्यात आली. दोन महिन्यात पावसाळा सुरू होईल. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे तातडीने नष्ट करावीत, अशा स्पष्ट सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या.
शिमगोत्सवासह शहरातील सर्वच सण व उत्सवांसाठी चाकरमानी मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर आदी विविध शहरांतून खेडमध्ये येत असतात. या गर्दीमध्ये एखादा डेंगी, मलेरियाबाधित व्यक्तीचा शहरात संपर्क येऊ शकतो.
यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून खेड तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व आरोग्य साहाय्यक यांनी शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये कंटेनर तपासणी केली. यामध्ये भांडी तपासण्यात आली. दूषित भांडी आढळून आल्यास ती भांडी ओतून रिकामी करणे तसेच आजूबाजूला गटारांमध्ये पाणी साचून राहिले असेल किंवा त्यामध्ये डास अळी असल्यास अशा ठिकाणी ऑईल बॉल अॅक्टिव्हिटी राबवण्यात आली.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य पर्यवेक्षिका सुजाता गोरे, आरोग्य पर्यवेक्षक नरेश इदाते तसेच खेड तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्यसेवक व आरोग्य साहाय्यक आणि खेड नगर पालिका दवाखाना येथे कार्यरत असलेले आरोग्यसेविका श्रीमती नाईक, आरोग्य साहाय्यक नीलेश सपकाळ आणि आरोग्य साहाय्यक अरूण जाधव तसेच तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रातील व आरोग्य साहाय्यक यांनी हे सर्वेक्षण केले. येत्या दोन महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे.
पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूला ठेवलेले टायर, नारळाच्या करवंट्या, चमचे, झाकण नसलेल्या बाटल्या देवघरांमध्ये पाण्यामध्ये ठेवलेले नारळ, फ्रिजच्या मागील ट्रेमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती कशी होते, हे प्रभागातील नागरिकांना समजावून सांगण्यात आले. तसेच आरोग्याविषयी समुपदेशन करण्यात आले. तालुक वि आरोग्य पर्यवेक्षिका सुजाता गोरे यांनी या विषयी सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 03/Apr/2025














