संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात अवैधरित्या होणारे वाळू उत्खनन आणि त्याची वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. तहसीलदार अमृता साबळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांच्या कार्यालयातील सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून वाळू उत्खनन आणि वाहतूक होणार नाही याची विशेष दक्षता घेत आहेत.
रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतुकीची शक्यता लक्षात घेता, महसूल विभागाने अधिक सतर्कता दाखवली आहे. यासाठी दररोज रात्री 9:00-सकाळी 6:00 या वेळेत विशेष गस्त घालण्यात येत आहे. या गस्तीसाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत नियमितपणे पाहणी केली जात आहे. याव्यतिरिक्त, नायब तहसीलदारांची विशेष भरारी पथके देखील कार्यरत आहेत, जी अचानक ठिकाणी धाड टाकून तपासणी करत आहेत.
तहसीलदार साबळे यांनी सांगितले की, मागील आठवड्यात गस्ती पथकांनी करजुवे खाडी किनारी काही बेवारस पाईप, तीन होडी सदृश्य वस्तू आणि इतर साहित्य जप्त करून ते नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत झाली आहे. महसूल विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना कुठेही अवैध वाळू उत्खनन किंवा वाहतूक होताना आढळल्यास त्यांनी तात्काळ महसूल विभागाला संपर्क साधावा. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे संगमेश्वर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 11/Apr/2025














