सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथील उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या पूर्वेकडील चिपळूण-रत्नागिरी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. आता पाश्चिमेकडील रत्नागिरी-चिपळूण मार्गाचे पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण व्हावे तसेच नाल्याची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रस्ते महामंडळाने आरवली येथे माखजन व कुचोंबे या परिसरासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाच्या खालून पूर्व बाजूला कुचांबे, मरडव, कुंभारखाणी बुद्रुक, राजिवली, येडगेवाडीकडे जाण्यासाठी तर पश्चिमेला कोंडीवरे, माखजन, बुरबांड, कासे, करजुवे आदी गावांसाठी रस्ता तयार केला आहे. उड्डाणपूल व सेवारस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईत केल्याने बोजवारा उडाला होता. त्या रस्त्याचे व्यवस्थित मजबुतीकरण झालेले नव्हते.
त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते तसेच योग्य सपाटीकरण नसल्याने अवजड वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत होती. रस्त्याला नाले काढलेले नाहीत, काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे. महामार्गावरील आरवली हे माखजन व कुचांबे परिसरातील पंचवीसहून अधिक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणाहून एक किलोमीटरवर रेल्वेस्थानक असल्याने तेथे प्रवासी
व वाहनांची सतत वर्दळ असते.
इथूनच प्रवासी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीला जाण्यासाठी मध्यवर्ती अधिकृत थांब्यावर बसची वाट पाहतात; मात्र सत्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकदा एसटी व खासगी वाहनचालक सेवारस्त्याऐवजी उड्डाणपुलावरून वाहने सुसाट नेतात. यामध्ये प्रवाशांची कुचंबणा होते. प्रवाशांना तिष्ठत वाट पाहावी लागते. या सेवारस्त्यांची तातडीने दुरूस्ती होणे गरजेचे आहे.
या रस्त्याबाबत वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती; परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. शेवटी आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. यामध्ये जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेवटी ठेकेदारांना यामध्ये लक्ष घालावे लागले. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. – मंगेश परकर, सामाजिक कार्यकर्ता आरवली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 18/Apr/2025














