खेड : तालुक्यातील आंबये येथील प्रसिद्ध भैरी कोटेश्वरी देवस्थानला संदीप बबन सकपाळ आणि सागर बबन सकपाळ यांच्या परिवाराने चंदनाची आकर्षक पालखी अर्पण केली आहे. विशेष बाब म्हणजे या पालखीसाठी लागणारे चंदन उत्तर प्रदेशातून मागवण्यात आले होते आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चंदनाची पालखी आंबये देवस्थानाला प्राप्त झाली आहे.
या पालखीची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मानकरी, पुजारी आणि देवस्थान ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप बबन सकपाळ आणि त्यांचे बंधू यांनी उत्तर प्रदेशातून चंदन आणून मुंबईत ही पालखी तयार करून घेतली आणि तिचे लोकार्पण केले. जंगम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण विधी पार पडला.
या अनोख्या पालखीबद्दल बोलताना एका ग्रामस्थाने सांगितले की, “महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या आंबये गावाला चंदनाची पालखी मिळणे हे आमच्या गावचे भाग्य आहे. सकपाळ कुटुंबीयांनी त्यांची इच्छा पूर्ण करून ही पालखी देवस्थानाला सुपूर्द केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
सकपाळ कुटुंबीयांच्या या उदार भावनेचे आणि चंदनाची दुर्मिळ पालखी अर्पण केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या पालखीमुळे देवस्थानाच्या वैभवात आणखी भर पडली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 19-04-2025














