चिपळूण : चिपळूण शहरात काही ठिकाणी अतिक्रमणांनी पुन्हा डोके वर काढले आहे. बहादूरशेख, भोगाळे परिसरासह वर्दळीच्या काही भागात बांबू व प्लास्टिक लावून तसेच झाडांना दोरी बांधून व्यावसायिकांनी अतिक्रमण सुरू केले आहे. मध्यंतरी झालेल्या कारवाईचा धसका अतिक्रमण करणाऱ्यांनी घेतला होता.
अतिक्रमणांना कायमस्वरूपी आळा बसावा, यासाठी न.प.ने पथक नेमून दिवसभर कारवाई सुरू ठेवली होती. मात्र, तीन दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेत अतिक्रमण करणाऱ्यांनी पुन्हा एकदा हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कठोर भूमिकेमुळे शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तसेच चौक व प्रमुख वर्दळीच्या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
आठ दिवसांनंतर ही कारवाई थांबेल, असे सुरुवातीला अतिक्रमण करणाऱ्यांसहीत नागरिकांना वाटले होते. मात्र, मुख्याधिकारी भोसले यांनी कारवाई करण्याबाबतचा निर्णय कायम ठेवून अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याकरिता दिवसभरात दोन ते तीनवेळा विशेष अतिक्रमण विरोधी फिरते पथक तैनात ठेवले होते. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांनी याची धास्ती घेतली होती. काहींनी खासगी पर्यायी जागा शोधून व्यवसाय थाटले.
परंतु सलग सुट्ट्या आल्याचा गैरफायदा घेऊन पुन्हा एकदा शहरात काही ठिकाणी अतिक्रमणांनी हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. बहादूरशेख चौकाजवळ बीएसएनएल इमारतीनजिक व मध्यवर्ती बसस्थानक ते संपूर्ण भोगाळे परिसर अतिक्रमणांनी बकाल केला होता. कारवाईनंतर मात्र हा परिसर मोकळा झाला. बहादूरशेख कमानीजवळ अतिक्रमण करणाऱ्यांनी एका बाजूचा पूर्ण रस्ता सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत एकप्रकारे वाहतुकीस बंद केला होता.
अतिक्रमण हटविल्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली. परंतु आता याच ठिकाणी असलेल्या चौकानजिकच्या न.प. च्या माझी वसुंधरा अंतर्गत उभारलेल्या फलकाला झाकोळून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांनी खाद्यपदार्थ विक्री गाडी लावल्याचे दिसून येत आहे.
तसेच भोगाळे परिसरात खासगी जागेचा आधार घेत रस्त्यानजिकच्या झाडांना दोरी बांधून अतिक्रमण केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 21/Apr/2025
