वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी ६५० ग्रॅमच्या अर्भकाला दिले जीवदान

सावर्डे : अवघे २८ आठवड्यांची गरोदर असलेल्या महिलेला अचानक चक्कर आली. ती बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी दीप्ती आणि बाळाची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले. महिलेचा श्वास कोंडत आलेला असताना डेरवण येथील प्रसूतीतज्ज्ञांनी आपले कौशल्य पणाला लावले. महिला दीप्ती हिची प्रसूती पार पडली. २८ आठवडे वयाचे आणि ६५० ग्रॅम वजनाचे बाळ जगवण्याचे आव्हान हॉस्पिटलने पेलले. त्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

दीप्ती या महिलेची ही पहिलीच खेप असल्याने बाळाच्या चाहुलीने ती अगदी आनंदी होती; पण एक दिवस अचानक तिचे डोके दुखू लागले आणि तिला जोरात चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. घरातील सर्व चिंतित झाले. जवळच्या डॉक्टर्सनी दीप्ती आणि बाळाची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले. कामथे प्राथमिक रुग्णालयातून तिला वालावलकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

रुग्णवाहिका डेरवणला पोहचेपर्यंत दीप्तीचा श्वासदेखील कोंडत आला होता. डॉक्टर्सनी प्रसंगाचे गांभीर्य जाणून लगेचच तिला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. भूलतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञांनी आपले कौशल्य पणाला लावून तिची सुटका केली खरी; पण बाळ फक्त २८ आठवडे वयाचे असल्याने वजन फक्त ६५० ग्रॅमइतकेच होते. त्यामुळे आईचा जीव कदाचित वाचवू; पण बाळाची शाश्वती देता येणार नाही, असे डॉक्टरकडून सांगितले गेले. कारण, बाळाने जन्मानंतर श्वास घेतला नाही. शेवटी बाळाच्या छातीवर दाब देऊन हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला.

हळूहळू बाळाचे ठोके नियमित झाले; पण तरीही प्रयत्न म्हणून बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल केले गेले. या ६५० ग्रॅम वजनाच्या बाळाचा खडतर प्रवास सुरू झाला; पण उत्तम दर्जाच्या अतिदक्षता विभागात डॉ. अनिल कुरणे, डॉ. अंकिता सुर्वे यांच्यासह सहकारी, सर्व डॉक्टर व परिचारिकांनी क्षणोक्षणी बाळाची काळजी घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 21/Apr/2025