देवरुख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात इंजिनिअरिंग आणि एम.एम.एस. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. देवरुखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, तर कार्यकारी अध्यक्षा नेहा माने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व्यासपीठावर उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला पदवीधर विद्यार्थी, त्यांचे पालक, विविध विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे प्रेरणादायी गीत सादर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी डॉ. सुरेश जोशी यांचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि अभियांत्रिकी व एम.एम.एस. अंतिम वर्षाच्या निकालांचे विस्तृत विश्लेषण सादर केले. त्यांनी सांगितले की, महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९०.८६ टक्के लागला असून आजपर्यंत अभियांत्रिकी शाखेतून ६००० तर एम.एम.एस. शाखेतून ४५० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.
प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ही पदवी म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागील चार वर्षांच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक असल्याचे सांगितले. या ज्ञानाचा उपयोग करून समाजात आणि पर्यायाने देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात अभियांत्रिकी क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आणि त्यात विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वजांनी आणि विद्वानांनी केलेल्या ज्ञान निर्मितीचा आदर करून ते ज्ञान जतन करण्याचे, वापरण्याचे, वाढवण्याचे आणि इतरांना देण्याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आणि शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची उदाहरणे दिली. जीवनातील परिवर्तनाला स्वीकारून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेशही त्यांनी दिला.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या महाविद्यालयाच्या माध्यमातून कोकणातील शैक्षणिक गरज पूर्ण करण्याची संधी मिळाली याचा त्यांना आनंद आहे. ज्ञान आणि विकासाची तीव्र इच्छाशक्ती यशाकडे घेऊन जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अभियांत्रिकी ही आजच्या काळाची गरज असून स्नातकांनी देशासाठी कार्य करण्यासाठी सज्ज व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यानंतर सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघटनाप्रमुख प्रा. वैभव डोंगरे, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी आणि परीक्षा विभागातील कर्मचारी विनायक गोवरे, निलेश कानसरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आणि संवाद साधला. रोजगार प्राप्त केलेल्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. स्नेहभोजनाने या समारंभाची सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 22-04-2025














