रत्नागिरी : शिवरायांच्या शौर्याचे आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या गड-किल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला आस्था असते. या ओढीतूनच संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मलदेवाडी येथील अल्पेश सोलकर या तरुणाने महाराष्ट्रातील १५० गडकिल्यांची भटकंती पूर्ण केली आहे.
अल्पेश सोलकरने याआधी शंभर किल्ल्यांची भटकंती केली आहे. या प्रवासातून, अनुभवातून गडकिल्ले संवर्धनात पुढाकार घेतला. आताच्या तरुण पिढीने गडकिल्ले संवर्धन करावे, या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील किल्ले प्रचितगडाचे संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या दोन मोहिमासुद्धा झाल्या आहेत.
पहिल्या मोहिमेत गडाचा मुख्य दरवाजा मोकळा करण्यात आला. तसेच दुसऱ्या मोहिमेत बुरुज, गडावरील मंदिर परिसर, पाणी टाके आदींची साफसफाई करण्यात आली. प्रचितगडाचे काहीअंशी मोकळा झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, गिर्यारोहक मित्रमंडळीच्या सहकायनि ही प्रचितगडाची संवर्धन मोहीम सुरू केली. त्याने स्वतः पुढील करिअर याच क्षेत्राशी निगडित असावे म्हणून ‘संगमरत्न फाउंडेशन (एनजीओ) या संस्थेची सुरुवात केली.
शंभर गडकिल्यांच्या भटकंतीनंतर आता त्याने अतिशय कठीण अशा कोळघेर, राजधेर, इंद्राई, चांदवड, सुमारगड, महिपतगड, रसाळगड, गंभीरगड, पट्टा किल्ला, औंढा किल्ला यासह अनेक किल्यांवर चढाई करून महाराष्ट्रातील सुमारे १५० किल्ल्यांची भटकंती केली. सुमारगडला बहुतेक ट्रेकर्स महिपतगड आणि रसाळगडसह एकत्रितपणे भेट देतात. सुमारगडला महिपतगड आणि रसाळगडवरून ट्रेक करता येतो.
खोल जंगलात असलेल्या या किल्ल्याबद्दल फार कमी माहिती आहे. किल्ला उंच कड्यांनी वेढलेला आहे आणि तटबंदीमुळे किल्ल्याचा आकार तुलनेने लहान आहे. सुमारगडवर पाहण्यासाठी अनेक दगडी खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्यावरील गुहेत असलेल्या शिवलिंगाचेही दर्शन घेता येते.
स्वच्छ दिवशी सुमारगडवरून महिपतगड, रसाळगड, चकदेव आणि पर्वतगड पाहता येतात नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तोच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे ४ किल्ले येतात.
गडकिल्ले, ऐतहासिक स्थळे भटकंती सोवत ऐतहासिक घाटवाटा, स्थळे, समाधी स्थळे, मंदिरे, लेणी, किल्ले यांच्या अभ्यास मोहिमा घडविण्याचा मानस संगमरत्न फाउंडेशनचा आहे.
किल्ले भटकंती या प्रवासात स्वतःला अधिक समृद्ध होताना पाहतोय, सोबतच बलदंड असा किल्ले प्रचितगडवर श्रमदान करण्याची संधी मिळतेय ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आहे. ऐतिहासिक जागांवर अनुचित प्रकार न होऊ देता, त्यांचे पावित्र्य जपलं पाहिजे, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि पर्यटन विकास होत राहिला पाहिजे-अल्पेश सोलकर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 22/Apr/2025














