अतिरिक्त सुरक्षा ठेवची ‘महावितरण’कडून स्वतंत्र बिल

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल किंवा मे महिन्याच्या वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल पाठवण्यात आली आहेत. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार असून, सर्व वीज ग्राहकांनी या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. ऐन उन्हाळ्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना हा शॉक दिला आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युतपुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची दरवर्षी पुनर्गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर मागील एका वर्षातील ग्राहकांच्या वीजवापराच्या सरासरीनुसार आणि विनियम १३.११ नुसार ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार व्याज (सध्यासाठीचा व्याजदर ६ टक्के) वीज बिलामध्ये समायोजित करून ग्राहकांना परत केले जाते. लघुदाब वीजग्राहकांना ही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम घरबसल्या भरण्याची सोय महावितरणच्या www. mahadiscom.in या वेबसाइटवर आणि महावितरणच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 24/Apr/2025