टॅग केलेल्या कासवांची घरवापसी; दुसऱ्यांदा अंडी घालण्यासाठी पुन्हा गुहागरच्याच किनारी

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर ‘फ्लिपर टॅगिंग’ केलेल्या तीन मादी कासवांनी आश्चर्यकारकरीत्या एकाच महिन्यात दुसऱ्यांदा घरटी करून अंडी घातली आहेत. ‘कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागा’ने ही महत्त्वपूर्ण नोंद केली असून, या घटनेमुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवांची एकाच हंगामात एकापेक्षा अधिक वेळा अंडी घालण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (डब्लूआयआय) आणि ‘कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण’ विभागाने संयुक्तपणे कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ अभियान राबवले होते. या अंतर्गत, किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांच्या परांवर विशिष्ट सांकेतिक धातूच्या पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६२ मादी कासवांना टॅग लावण्यात आले होते, ज्यामध्ये सर्वाधिक ५९ टॅग गुहागरच्या किनाऱ्यावर लावण्यात आले होते.

या टॅग केलेल्या कासवांपैकी तीन माद्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अंडी घातल्यानंतर महिनाभरातच पुन्हा गुहागरच्या किनाऱ्यावर येऊन दुसरी घरटी केली. १ फेब्रुवारी रोजी टॅग क्रमांक १११४३-१११४४ असलेल्या मादीने २२ फेब्रुवारीला, तर ३१ जानेवारी रोजी टॅग क्रमांक १११२७-१११२८ असलेल्या मादीने २ मार्चला दुसऱ्यांदा अंडी घातली. यासोबतच, ११२०१-११२०२ क्रमांक असलेल्या मादीने १२ फेब्रुवारीला पहिली घरटी केली आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, २ मार्चला पुन्हा अंडी घातली.

यापूर्वी, ओडिशा येथे २०२१ मध्ये टॅग केलेली एक मादी कासव जानेवारी २०२५ मध्ये गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालताना आढळली होती. तसेच, आंजर्ले किनाऱ्यावर सॅटलाईट टॅग केलेली ‘सावनी’ नामक मादी कासवाने केळशी किनाऱ्यावर अंडी घातल्याची नोंद झाली होती. सागरी कासवांच्या माद्या विणीच्या एकाच हंगामात त्याच किनाऱ्यावर दुसऱ्यांदा अंडी घालण्यासाठी येत असल्याच्या या नोंदी ‘फ्लिपर टॅगिंग’च्या महत्त्वपूर्ण यशाचे प्रतीक आहेत. या नोंदीमुळे घरट्यांची नेमकी संख्या ओळखणे आणि दोन्ही वेळेच्या अंड्यांमध्ये काय फरक आहे, हे समजून घेणे शक्य होत आहे.

या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल बोलताना, कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार म्हणाल्या, “जर आपण अधिक माद्यांना ‘फ्लिपर टॅगिंग’ करू शकलो, तर या माध्यमातून अधिक ठोस आणि उपयुक्त माहिती मिळण्यास मदत होईल. “या नोंदीमुळे सागरी कासवांच्या जीवनचक्राबद्दल अधिक माहिती मिळत आहे, जे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 24/Apr/2025