ग्रंथालयनिर्मिती उपक्रमांतर्गत मंडणगडातील बालजगत, बोधमाला, तन्मयची रोजनिशी पुस्तकांची निवड

मंडणगड : शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या ग्रंथालयनिर्मिती उपक्रमांतर्गत राज्यस्तरावर रत्नागिरी जिल्ह्यातील सात पुस्तकांची निवड झाली आहे. त्यातील बालजगत, बोधमाला, तन्मयची रोजनिशी ही तीन पुस्तके मंडणगड तालुक्यातील असून, ती राज्यभर वितरित केलेली आहेत. सध्या राज्यभरातील विद्यार्थी वाचनात मग्न झालेले आहेत.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी लेखनाची आवड असलेले शिक्षक, अधिकारी यांच्यासाठी प्रथमच ग्रंथालयनिर्मिती उपक्रम हाती घेण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण ४२ पुस्तके या स्पर्धेतून जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण (डाएट) विभागाकडे सादर केली होती. त्यामधील १८ पुस्तकांची जिल्हास्तरावर निवड झाली. राज्यस्तरावर ७ पुस्तके पात्र ठरली. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील शिक्षिका सुप्रिया चाळके यांचे बालजगत, सुधीर दराडे यांचे बोधमाला, भाऊसाहेब ठुले यांचे तन्मयची रोजनिशी या तीन पुस्तकांची निवड झाली आहे.

ती पुस्तके छपाई करून राज्यभरात वितरितही करण्यात आली आहेत. मंडणगड तालुक्यातदेखील जिल्हा परिषद शाळांमधून ही पुस्तके पोहोचली असून, आपल्या शिकवणाऱ्या शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके वाचताना विद्यार्थांच्या चेहऱ्यावरच कुतूहल आहे. अनेक जिल्ह्यांतून संबंधित लेखक शिक्षकांना चांगल्या कौतुकाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पुस्तकांचे स्वागत झाल्याने त्याचे समाधान या शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. विविध स्तरांवर लेखक शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.

शासनाच्या या अनोख्या उपक्रमात वेगळा अनुभव आणि लेखनासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. रत्नागिरी डाएटचे आचार्य शिवलकर तसेच अधिव्याख्याता दीपा सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले, शिक्षक दिलीप मराठे यांच्याकडून प्रेरणा मिळाली. अनेक शिक्षकांचे सहकार्य लाभले. मंडणगड तालुक्यातून महाराष्ट्रातील कानाकोपन्यातील शाळेतील मुलांपर्यंत आमचं पुस्तक पोहचत आहे. याचा अभिमान आहे-सुप्रिया चाळके, बालजगत लेखिका.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 24/Apr/2025