रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडीच्या समुद्रात दुसऱ्या मासेमारी बोटींना बेकायदेशीरपणे एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या एका बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी रात्री कारवाई केली. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी आढळले असून, बोट जप्त करण्यात आली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे दि. २५ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री ००.४५ वाजण्याच्या सुमारास बुरोंडीच्या समोर ११.५ सागरी मैलावर गस्त घालत होते. त्यावेळी नझीम अली जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांच्या मालकीची ‘साबीर’ ही नौका (नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-493) महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतपणे एलईडी लाईटचा वापर करताना आढळून आली. या बोटीवर तांडेल आणि दोन खलाशी होते.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी लाईट वापरणाऱ्या या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. बोटीवर मासळी आढळली नसली तरी, एलईडी लाईट आणि ते पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेस्कर आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ), सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षा रक्षक आणि गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 25/Apr/2025














